हैडलाइन

महापौर श्रीमती रितू तावडे यांचे आढावा बैठकीत निर्देश

मुंबई महानगरातील प्रमुख नाले व लहान नाले यातून गाळ काढण्‍याची सर्व कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावीत. त्‍यासाठी आवश्‍यक मनुष्‍यबळ व संसाधनांचा प्रभावीपणे वापर करावा. प्रशासकीय विभाग कार्यालय (Ward Ofiice) आणि मध्‍यवर्ती यंत्रणा (Central Agency) यांच्‍यात समन्‍वय राखून कामे निर्धारित वेळेत पूर्ण करावीत. लोकप्रतिनिधी व नगरसेवक यांना प्रत्‍येक कामाच्‍या टप्‍प्‍याची नियमित माहिती द्यावी. ज्‍या नाल्‍यांची स्‍वच्‍छता सुरू आहे त्‍या ठिकाणी संबंधित नाल्‍याची लांबी - रूंदी, गाळ काढण्‍याचे परिमाण, कालावधी, कंत्राटदाराचे नाव आणि संबंधित अभियंत्‍याचा संपर्क क्रमांक आदींची माहिती दर्शविणारा फलक कार्यस्‍थळी लावावा. नाल्‍यातून काढलेल्‍या गाळाची ४८ तासात योग्‍य प्रकारे विल्‍हेवाट लावावी. नाले स्‍वच्‍छतेच्‍या कामात पारदर्शकता सुनिश्चित करण्यासाठी गाळ काढण्‍यापासून ते क्षेपणभूमीवर त्‍याची विल्‍हेवाट लावण्‍यापर्यंतच्‍या सर्व टप्‍प्‍यांचे छायाचित्रण, चित्रिकरण अनिवार्य करावे, असे विविध निर्देश महापौर रितू तावडे यांनी दिले आहेत.


मुंबईतील पावसाळापूर्व नाल्यांमधून गाळ काढण्याच्या कामांविषयी आढावा बैठक आज (दिनांक १३ मार्च २०२६) सकाळी महानगरपालिका मुख्यालय येथे स्थायी समिती सभागृहात पार पडली. महापौर रितू तावडे अध्यक्षस्‍थानी होत्‍या. त्‍यावेळी त्‍यांनी हे निर्देश दिले. उपमहापौर संजय घाडी, सभागृह नेते गणेश खणकर, स्‍थायी समिती अध्‍यक्ष प्रभाकर शिंदे, शिक्षण समिती अध्यक्ष राजेश्री शिरवडकर, सुधार समिती अध्यक्ष संध्‍या दोशी, अतिरिक्‍त महानगरपालिका आयुक्‍त (पश्चिम उपनगरे) डॉ. विपिन शर्मा, अतिरिक्‍त महानगरपालिका आयुक्‍त (प्रकल्‍प) अभिजीत बांगर, अतिरिक्‍त महानगरपालिका आयुक्‍त (पूर्व उपनगरे) अविनाश ढाकणे यांच्‍यासह सर्व परिमंडळ सहआयुक्‍त/ उप आयुक्‍त, सर्व विभागांचे सहायक आयुक्‍त तसेच पर्जन्य जलवाहिन्या विभागाचे अधिकारी या बैठकीस उपस्थित होते.


महापौर रितू तावडे म्‍हणाल्‍या की, पावसाळ्यात पाण्याचा निचरा व्यवस्थित व्हावा आणि मुंबईकरांना जोरदार पावसामुळे कोणताही त्रास होऊ नये यासाठी प्रशासनाने दक्षता बाळगावी. प्रमुख नाले व लहान नाले यांबरोबरच अतर्गत नाल्‍यांचीदेखील स्‍वच्‍छता करावी. नालेस्‍वच्‍छतेची जबाबदारी पूर्ण गांभीर्याने आणि देखरेखीखाली पूर्ण करावी. दिनांक ३१ मेपर्यंत पावसाळ्यापूर्व नालेस्‍वच्‍छतेचे संपूर्ण उद्दिष्ट्य गाठावे. अतिरिक्‍त यंत्रणा कार्यान्वित करुन गाळ काढण्‍याची कार्यवाही तत्‍काळ सुरू करावी. नदी/ नाल्‍याकाठी राहणा-या नागरिकांना पावसाळ्यात धोका निर्माण होऊ नये, याची खबरदारी घ्‍यावी. आवश्‍यक तेथे संरक्षक भिंत बांधावी. लोकप्रतिनिधी, नगरसेवकांना विश्‍वासात घ्‍यावे. नाले स्‍वच्‍छतेच्‍या कामांची टप्‍पेनिहाय माहिती नगरसवेकांना द्यावी. अडीअडचणी असल्‍यास नगरसेवकांना अवगत करावे व समस्यांचे निराकरण करावे. नाल्‍यातून काढलेल्‍या गाळाची ४८ तासात विल्‍हेवाट लावावी. त्‍यावर द्रव्य फवारणी करावी. गाळ वाहतूक करणा-या वाहनांवर ‘व्‍हेईकल ट्रॅकिंग सिस्‍टीम’ (VTS) लावावी. या वाहनांवर ताडपत्रीचे आच्‍छादन असावे. गाळाचे मोजमाप योग्‍य प्रकारे करावे. गाळ काढण्‍याबरोबरच तरंगता कचरादेखील वेळोवेळी काढावा, असे निर्देश महापौर रितू तावडे यांनी दिले.

या बैठकीत उपमहापौर संजय घाडी, सभागृह नेते गणेश खणकर, स्‍थायी समिती अध्‍यक्ष प्रभाकर शिंदे, शिक्षण समिती अध्यक्ष राजेश्री शिरवडकर, सुधार समिती अध्यक्ष संध्‍या दोशी यांनी विविध सूचना केल्‍या.


अतिरिक्‍त महानगरपालिका आयुक्‍त (प्रकल्‍प) अभिजीत बांगर यांनी पर्जन्‍य जलवाहिन्‍या विभाग आणि रस्‍ते व वाहतूक विभागामार्फत सुरू असलेल्‍या कामकाजाची माहिती दिली. तर, महापौर रितू तावडे यांच्‍यासह सर्व लोकप्रतिनिधींनी दिलेल्‍या निर्देशांचे सर्व सह आयुक्‍त / उप आयुक्‍त, सहायक आयुक्‍त यांनी काटेकोरपणे पालन करावे. नगरसेवक यांसमवेत संवाद साधावा. त्‍यांच्‍या तक्रारींचे निराकरण करून प्रतिसाद द्यावा, असे निर्देश अतिरिक्‍त महानगरपालिका आयुक्‍त (पश्चिम उपनगरे) डॉ. विपिन शर्मा यांनी दिले. 


Most Popular News of this Week

वर्ल्ड योगासन चॅम्पियनशिप...

'पहिल्या वर्ल्ड योगासन चॅम्पियनशिप २०२६' मध्ये चंद्रपूर जिल्ह्याच्या...

राहुल शेवाळे यांच्या...

शिवसेना झोपडपट्टी महासंघाच्या वतीने इयत्ता KG, Sr. KG व इयत्ता पहिलीमध्ये...

शाळेच्या पहिल्या दिवशी...

जिल्हा परिषद शाळांच्या नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी आयोजित...

दिव्यांगांच्या सर्वांगीण...

जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांच्या सर्वांगीण विकासाला गती देण्यासाठी आणि...

पिण्याच्या पाण्याच्या...

'अल नि‍नो'मुळे पावसाने ओढ दिल्‍याने आणि मुंबई महानगराला पाणीपुरवठा...

जय पवार यांची मान्सूनच्या...

महाराष्ट्रात पावसाच्या आगमनास होत असलेल्या विलंबाची सद्यस्थिती आणि...